भूगोल : सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या व अन्य माहिती :
एकूण लोकसंख्या : २५,८३,५२४  
दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९५७  
स्त्रिया १२,६३,  
पुरुष १३,२०,०८८  
ग्रामीण लोकसंख्या १९,५०,३०६  
शहरी लोकसंख्या ६,३३,२१८  
साक्षरता (एकूण) ७६.६२ %  
पुरुष साक्षरता ८६.२६%  
स्त्री साक्षरता ६६.७३%  

कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून माणगंगा,मोरणा,वारणा,येरळा,अग्रणी,बोर या जिल्ह्यातील इतर नद्या आहेत. जिल्ह्यात वारणा नदीवर चांदोली येथे धरण असून कुची, अंजनी, भोसे, कोसारी, वज‘चोंडे, रेठरे, आटपाडी इत्यादी लहान-मोठी धरणे आहेत. याशिवाय कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात अनेक लहान-मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. पवन उर्जा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील गुढेपाचगणी व ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत.

बळीराजा धरण हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प खानापूर तालुक्यात येरळा नदीवर उभारण्यात आला आहे. हे छोटे धरण शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व अभियंते यांनी एकत्र येऊन बांधले आहे. शास्त्र ,तंत्रज्ञान, पर्यावरण, पाणी अडवण्याचे व साठवण्याचे पारंपरिक-आधुनिक मार्ग आणि मानवी मूल्ये या सर्व घटकांचा संतुलित विचार हे धरण बांधताना करण्यात आला आहे. प्रामुख्याने बाळावाडी व तांदुळवाडी या खेड्यांच्या परिसरातील सुमारे ९०० एकर जमिनीला या धरणाचा फायदा होतो. ‘छोट्या धरणांतून अधिक विकास’ या चळवळीचे बळीराजा धरण हे एक उत्तम प्रतीक म्हणता येईल.

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असून वर्षात सरासरी ५० ते ७५सेमी एवढा पाऊस जिल्ह्यात पडतो. पश्चिमेकडील शिरोळे तालुक्यात जास्त पाऊस पडतो, तर तो पूर्वेकडे कमी होत जातो. मिरज येथे फक्त ६४०मि.मी.एवढाच पडतो. खनिजांचा विचार करता जिल्ह्यात प्रामुख्याने शिराळा तालुक्यात बॉक्साईटचे साठे सापडतात.

प्रशासन :जिल्हयात एकूण दहा तालुके आहेत.- (संदर्भ जनगणना २००१)
क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
शिराळा ६२६.२ १,५८,२९८
वाळवा ७९०.१ ४,२७,३७७
पलूस २७६.० २,१६,५६६
खानापूर २,४२७.३ २,५८,२३१
आटपाडी ८८५.० १,२५,२६३
तासगाव ८८३.४ २,१३,२०५
मिरज १,१०५.५ ७,५६,०४८
कवठे-महांकाळ ९३६.० १,४४,५९६
जत २,२५२.० २,८३,९५०
१० कडेगाव    
जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
क्र तपशील संख्या नावे
महानगरपालिका ०१ सांगली-मिरज-कुपवाड (७४ प्रभाग)
नगरपालिका ०४ इस्लामपूर, तासगांव, आष्टा, विटा.
पंचायत समित्या १० शिराळे, वाळवे, पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव,मिरज, कवठे-महांकाळ ,जत, कडेगाव.
ग्रामपंचायती ७०४ ----

राजकीय संरचना :
लोकसभा मतदारसंघ : सांगली - मिरज, सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)

विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव -कवठे महांकाळ व जत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.

विशेष : 'नाटक’ हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक (सीतास्वयंवर) सादर केले.

औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी! कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतूवाद्यांची निर्मिती हे सांगलीचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.

संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहे.

शेती :ल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.

सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यातल्यात्यात तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत -तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

जिल्ह्यात घेतल्या जाणार्‍या विविध पिकांचा हंगामनिहाय तपशील पुढील रकान्यात दिला आहे.

क्र. हंगाम प्रमुख पिके
खरीप तांदूळ, ज्वारी, तंबाखू
रब्बी गहू, हरभरा
खरीप व रब्बी ज्वारी, ऊस

उद्योग :जिल्ह्यात सांगली, मिरज,विटा,कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे.

साखर कारखाना सूची :
क्र. नाव गाव, तालुका
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली
विश्र्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यावंतनगर, शिराळा
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे, वाळवा
हुतात्मा किसन आहेर सहकारी साखर कारखाना वाळवा
महंकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू नगर, कवठे-महांकाळ
यशवंत सहकारी साखर कारखाना नागेवाडी, खानापूर
सोनहित सहकारी साखर कारखाना वांगी, खानापूर
डोंगराई सागरेश्र्वर सहकारी साखर कारखाना रायगाव, खानापूर
माणगंगा सहकारी साखर कारखाना लोनार सिद्धनगर, आटपाडी
१० तासगाव सहकारी साखर कारखाना तुरची, तासगाव
११ राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना तिप्पेहळ्ळी, जत
१२ निनाईदेवी सहकारी साखर कारखाना कोकरुड, शिराळा

जिल्ह्यातील मिरज हे प्रामुख्याने तंतुवाद्यांसाठी प्रसिद्ध असून येथील सतार, तंबोरा, सारंगी, वीणा घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. अनेक सुप्रसिद्ध असे कलावंत तंतुवाद्यांसाठी मिरजला भेट देतात.

सांगली येथील हळद,गूळ व शेंगांची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील पहिली सूतगिरणी (लिंबा सूत गिरणी) दादासाहेब वेलणकर यांनी सुरू केली होती.

क्र उद्योग/व्यवसाय ठिकाण
शेतीची अवजारे किर्लोस्करवाडी (किर्लोस्कर समूह)
हिर्‍यांना पैलू पाडणे विटा, माहुली,नेलकरंजी
अडकित्ते तयार करणे बागणी
बेदाणे, मनुका तयार करणे तासगाव
सूत गिरणी सांगली
कापड गिरणी माधवनगर,मिरज
दूध उत्पादने भिलवडी, तासगाव (चितळे उद्योग समूह)

दळणवळण :राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

सांगलीचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
...पासून अंतर (कि.मी.)
मुंबई ३९१
नागपूर ७६३
औरंगाबाद ४५७
रत्नागिरी १७९
पुणे २३१